सावंतवाडी: मध काढण्यासाठी झाडावर चढलेल्याओटवणे-भटवाडी येथील एका ३९ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धेश नागेश कविटकर असे मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री हा अपघात घडला होता. त्यानंतर गोव्यातील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांना परिचित असलेल्या सिद्धेशच्या या अकाली निधनाने कविटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण ओटवणे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश कविटकर हा गुरुवारी रात्री १० च्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसोबत मध काढण्यासाठी ओटवणे मांडफातरवाडी सीमेदरम्यान असलेल्या एका खाणीनजीकच्या झाडावर चढला होता.झाडावर काही अंतरावर गेल्यानंतर अचानक त्याचा तोल सुटला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की, सिद्धेशच्या डोक्याला, नाकाला, तोंडाला आणि पायांना गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्याला तातडीने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
