स्टोरी

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात सावंतवाडी तालुक्यातील १९ गावांमध्ये १८,९५३ रुग्णांची मोफत तपासणी.

Spread the love

फिरता दवाखाना

सावंतवाडी प्रतिनिधी: फिरत्या दवाखान्यासोबत डॉ. स्वप्नील परब, डॉ नेहा परब,श्वेता सावळ, डॉ प्रवीणकुमार ठाकरे सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात सावंतवाडी तालुक्यातील १९ गावांमध्ये १८,९५३ रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. सह्याद्री पट्ट्यात हा फिरता दवाखाना वरदान अर्थात संजीवनी देणारा ठरला आहे. गेले दोन वर्षे अविरत सेवा देणारा हा फिरता दवाखाना गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी आरोग्याचा आणि विश्वासाचा आधार बनला आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहे. या सेवाभावी संस्थेतर्फे गेल्या १३ वर्षांपासून अनेक उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हयात राबविण्यात येत आहेत. प्रतिष्ठानच्या या “फिरता दवाखाना” उपक्रमासाठी मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशन ऑफ साऊथ मुंबई या सेवाभावी संस्थेचे महत्त्वाचे सहकार्य लाभत आहे.

फिरत्या दवाखान्यात रुग्णांना उपचार देण्यासाठी कार्यरत टीम.

ही संस्था वर्ल्ड प्राणिक हिलींग फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून याचे संस्थापक मास्टर चोआ कॉक सुई होते. त्यांच्याच नावे हा फिरता दवाखाना कार्यरत आहे. या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सावंतवाडी संस्थान चे जी युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते करण्यात आले होते. हा फिरता दवाखाना दोन दिवसाआड सकाळच्या सत्रामध्ये फणसवडे, केसरी, दाणोली – गावठाण, पारपोली, देवसु, ओवळीये, वेर्ले, कुणकेरी, आंबेगाव या गावात तर सायंकाळच्या सत्रात न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, कास, सातोसे, निगुडे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, नेतर्डे या दुर्गम भागात जातो. हा फिरता दवाखाना सावंतवाडीतून सकाळी ८ वाजता सुटल्यानंतर दुपारी १ च्या सुमारास सावंतवाडीत येतो. तर दुपारी २ च्या सुमारास सावंतवाडीतुन सुटल्यानंतर सायंकाळी उशिरा ७:३० पर्यंत सावंतवाडीत परत येतो. दोन्ही सत्रामध्ये प्रत्येकी दोन ते चार गावे केली जातात. हा फिरता दवाखाना या १९ गावात आठवड्यातून दोनवेळा जातो. दर रविवार आणि महत्वाचे सण वगळता हा फिरता दवाखाना रुग्णांना सेवा देत आहे.

फिरत्या दवाखान्याचा लाभ घेतांना महिला रुग्ण

गेल्या दोन वर्षात सकाळच्या सत्रात या डॉ. प्रविणकुमार ठाकरे ८,७२८ स्त्री व ५,९४३ पुरुष रुग्णांसह एकूण १४,६७१ रुग्णांनी लाभ घेतला. तर यावर्षी १ मार्च पासून सायंकाळच्या सत्रात सुरू झालेल्या या फिरत्या दवाखान्याचा २,६६३ स्त्री रुग्ण व १,६१९ पुरुष रुग्णांसह एकूण ४,२८२ रुग्णांनी लाभ घेतला. तसेच या दवाखान्यात आजपर्यंत १,८२६ रुग्णांच्या ब्लड शुगरची मोफत तपासणी करण्यात आली आहे. या फिरत्या वैद्यकीय दवाखान्याच्या गाडीतच रुग्णांची तपासणी करण्यात येत असुन त्यात डॉक्टर, परिचारिका व रुग्णासाठी आसन व्यवस्था, बेसिन, तपासणी कक्ष, औषध विभाग अशी व्यवस्था आहे. या फिरत्या दवाखान्यात डॉ. स्वप्नील परब, डॉ नेहा परब, परिचारिका श्वेता सावळ, कोमल सावंत, चालक सुहास धुरी तर वेदा गुरव या कार्यालयात लिपीक आहेत.

फिरत्या दवाखान्याचा लाभ घेतांना वरिष्ठ महिला रुग्ण

ग्रामीण व अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सिंधूमित्र प्रतिष्ठानने ‘फिरता दवाखाना’ उपक्रम सुरू केला. गेली दोन वर्षे हा फिरता दवाखाना अविरतपणे गरजूंपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा पोहोचवत आहे. या फिरत्या दवाखान्यातून तपासणीसह औषधेही मोफत मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचा वैद्यकीय उपचारांवर होणारा खर्च वाचत असून त्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.​ दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेला किमान आरोग्य सुविधा मिळणे हे आव्हान मानले जात असताना ‘सिंधूमित्र प्रतिष्ठान’च्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘फिरता दवाखाना’ ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. या फिरता दवाखान्यामुळे रुग्णांना थेट त्यांच्या गावातच आरोग्य तपासणी व उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावातच मोफत उपचार मिळाल्याने हजारो रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापूर्वी आजारावरील उपचारांसाठी तालुक्याच्या गावी जl व प्रवासासह वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. परंतु आता हा फिरता दवाखाना गावातच येत असल्यामुळे वेळीच उपचार होतात. त्यात कित्येक गोरगरीब रुग्णांना तपासणीसह औषधांचा खर्च परवडत नव्हता.

डॉ. प्रविणकुमार ठाकरे

डॉ. प्रविणकुमार ठाकरे :- सेवेचा महत्वाचा दुवा..! सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे आणि त्यांचे सहकारी या प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनच गेली १३ वर्षे जनसामान्यांच्या सेवेचे व्रत जोपासत आहेत. प्रतिष्ठानच्या अनेक उपक्रमांपैकी फिरत्या दवाखान्याची जबाबदारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दीपक गावकर आणि भगवान रेडकर पाहतात. प्रतिष्ठान निःस्वार्थी भावनेने सावंतवाडी शहरासह ग्रामीण ते अतिदुर्गम भागात सातत्याने आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबवते. डॉ. ठाकरे आपल्या परिचयाच्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमांचा लाभ गरजवंतांना मिळवून देत असल्यामुळेच ते आज गोरगरिबांसह गरजवंतांचे आश्रयदाते बनले आहेत. याच समाजसेवेतील पुढचे पाऊल म्हणून या प्रतिष्ठानने योग विद्या प्राणिक हिलींग फाऊंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्या सहकार्याने ‘ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरता दवाखाना’ दुर्गम भागासाठी सुरू केला आहे. मुंबईतील ही संस्था डॉ. ठाकरे यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहे. यापुढेही या संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ जिल्ह्यातील गरजूंना मिळवून देण्याचा डॉ. ठाकरे यांचा मनोदय आहे. गोरगरीब, गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्या आरोग्यसेवेचे खरे यश असून पुढील काळात या सेवेचा विस्तार करून आणखी दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प असल्याचे डॉ ठाकरे यांनी सांगितले.

प्रतिष्ठानचे उपक्रम आदर्शवत!

प्रतिष्ठानने दुर्गम व ग्रामीण भागात ३५ मोफत आरोग्य शिबिरे घेताना ३८४७ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे दिली. १६ शाळा मधील ७३७ विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी केली. प्रतिष्ठानच्या कै डॉ डी बी खानोलकर रुग्ण सेवा केंद्रामार्फत आतापर्यंग ८७१ गरजूंना रुग्णपयोगी साहित्य मोफत वापरायला दिले. प्रतिष्ठानने कोविड काळात केलेले कार्यही संस्मरणीय असून गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीसह इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, २० शाळामधील शब्दगंध वाचनालय, शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांचे दरवर्षी शिव व्याख्यान आदी सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने सुरू असतात. प्रतिष्ठानचे हे अविरत कार्य कौतुकास्पद असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहे.


Spread the love

Related posts

सुंदर गाव स्पर्धेसाठी वायंगवडे गावचे झाले मूल्यमापन…!

news

चिनी सीमेवर सर्व काही आलबेल होईपर्यंत चीनचा कुठलाही नवा प्रस्ताव भारत स्वीकारणार नाही

news

कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने कवी दादा मडकईकर यांचा सत्कार होणार…!

news

Leave a Comment