सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) केंद्रीय साहित्य संमेलन येत्या नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेचे अधिकृत ‘कोमसाप गीत’ निश्चित करण्यासाठी तालुका ते केंद्रीय स्तरावर गीत रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण या तालुका शाखांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गेल्या आठवड्यात तालुकास्तरावर स्पर्धा झाल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. जिल्हास्तरावर एकूण ९ स्पर्धक सहभागी झाले होते – सावंतवाडीतून नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, गजेंद्र कोठावळे, कुडाळमधून आनंद वैद्य, राज भिंगारे, संदीप साळसकर आणि मालवणमधून रुजारिओ पिंटो, मंदा सांबारी, ऋतुजा केळकर. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ग्रंथमित्र पुरस्कार विजेते कवी-लेखक आनंद वैद्य (कुडाळ) यांच्या गीतरचनेला, द्वितीय क्रमांक मालवणी कवी रुजारिओ पिंटो (मालवण) यांना, तर तृतीय क्रमांक नकुल पार्सेकर (सावंतवाडी) यांना मिळाला आहे. या तिन्ही निवडक गीत रचना आता प्रांत कार्यालयाकडे केंद्रीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहेत. सर्व स्पर्धकांचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव अॅड. संतोष सावंत आणि कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे.दरम्यान, दि. २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरी येथे होणाऱ्या केंद्रीय साहित्य संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोमसाप सदस्यांनी आपली नावे ३० सप्टेंबरपूर्वी आपल्या तालुका शाखेकडे किंवा जिल्हा सचिव अॅड. संतोष सावंत (मो. ९४२३०५१५३०) यांच्याकडे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
