मालवण वार्ताहर: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देव आणि धर्मीला कधीच विरोध केला नाही . मात्र देव आणि धर्माच्या नावाने सर्वसामान्य जनतेच्या श्रद्धेचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात प्रा . श्याम मानव साहेबांनी लढा चालू केला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तसेच काम अभाअंनि समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी चालू केले. मालवण तालुक्यातील एका गावातील भरवस्तीत गेली वीस ते पंचवीस वर्ष आपल्या अंगात दुर्गादेवीचा अवसर येतो असे भासवून एक व्यक्ती लोकांची फसवणूक करीत असल्याची खात्रीशीर माहिती जिल्हा संघटक विजय चौकेकर यांना समजली.
सदरची व्यक्ती जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सोमवार आणि मंगळवार दुर्गादेवी अंगात आली की मला भाविकांच्या समस्येवर उपाय माझ्या मुखातून भाविकांना सांगते त्यावर त्यांना उपाय सुचविते. त्यावेळी मला काहीही समजत नाही .मी लोकांची फसवणूक करीत नाही .असे भासवून लोकांच्या समस्येवर उपाय सांगत होता . तर शनिवारी दुर्गादेवीच्या प्रतिमेसमोर बसून भाविकांच्या समस्या दुर्गादेवीला विचारताच दुर्गादेवी आपल्या कानात समस्या व उपाय सूचविते असे भासवित असल्याचे लक्षात आले . हातात वाटीत विभूती घेऊन त्यावर बोटाने ठसे उमठवित लगेच लोकांच्या समस्येवर उपाय सांगत होता.
एकदा अंगात आल्यावर दुर्गादेवी खरोखरच त्याच्या अंगात येते आणि अचूक समस्या सांगते का याची खात्री करण्यासाठी विजय चौकेकर यांनी आपल्या सोबत जिल्हा संघटीका उज्वला येळावीकर आणि कुडाळ तालुका उपाध्यक्ष अतुल दळवी यांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचले . त्यानंतर पुन्हा शनिवारी आपल्या सोबत उज्वला येळावीकर,अतुल दळवी आणि योगेश वराडकर यांना आपले मुलगे म्हणून उभे केले तर उज्वला येळावीकर यांना मुलाची सासू म्हणून उभी केली .तरी सदरच्या व्यक्तीला उभी केलेली सासू खरी नाही अथवा मुलगे म्हणून उभे केलेल्या व्यक्ती माझे मुलगे नाहीत हे ओळखता आलेले नाही.
मुलाने रागाने सुनेला मारले ती माहेरी निघून गेलीय ती नांदायला यायला हवी त्यावर उपाय विचारले असता हातात विभूती घेऊन फुंकली व म्हणाले माझी शक्ती येथून सोडतो पंधरा तासात सून घरी येईल. जावयाने माझ्या मुलीला घरी आणून सोडले यावर उपाय विचारले असता मुलींवरील समंध बाधा मी काढतो मी येथून माझी शक्ती सोडतो जावई तीन दिवसात येऊन मुलीला नांदायला घेऊन जाईल .मुलाला सुनेला आणि लहान मुलाला घरातीलच परंपरागत खूनी देवचाराची बाधा आहे त्यावर उपायही करायला सांगितले . तीन महिन्यात आनंदाची बातमी तुम्हाला समजेल आणि वर्षाच्या आत तुमच्या मुलाला जुळी मुले होतील असेही सांगितले.
अंगात आल्यावर समस्यांवर दुर्गादेवीने त्यांच्या मुखातून सांगितलेले उपाय आणि शनिवारी देवींच्या प्रतिमासमोर आपणास साक्षात्कार होतो आहे व दुर्गादेवी मला कानात उपाय सांगते ते समोरच्या भाविकांना सांगून करीत असलेली सर्व सामान्य जनतेची फसवणूक लक्षात येताच विजय चौकेकर यांनी आपली व सोबत आलेल्यांची खरी ओळख सांगितली. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार नुसार आपण करीत असलेल्या कृती आणि लोकांना सांगत असलेले उपाय हे गुन्हा कसे ठरतात . यासाठी किती शिक्षा व दंड आहे हे सर्व त्यांच्या कुटुंबियासमोर समजावून दिले .त्यावेळी आपण करीत असलेल्या जनतेच्या फसवणूकीमुळे आपणास कायदाने शिक्षा होऊ शकते हे लक्षात आल्यावर मी आजपासून अंगात दुर्गादेवीचे वारेसुत्र काढणार नाही . तसेच मला साक्षात्कार झालाय . दुर्गादेवी मला लोकांच्या समस्या सांगते असे भासवून लोकांची फसवणूक करणार नाही . याबाबत लोकांना समजावे म्हणून मी तसा बाहेर बोर्ड हि लावून लोकांचे प्रबोधन करीन, पण माझ्या वयाचा विचार करून माझ्यावर गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केली .
सदरच्या वयस्कर व्यक्तीचे वय लक्षात घेऊन माणुसकीच्या नात्याने कुटुंबाच्या समक्ष लेखी कबुली जबाब लिहून घेतला. यावेळी गावच्या पोलिस पाटील यांनाही समक्ष बोलावून घेतले व त्यांनी त्यांना पुन्हा असे काही न करण्याचे बजावले. जर कोणी आपल्याला साक्षात्कार झाला आहे आणि मी कुणाचा तरी अवतार आहे, माझ्या अंगात कोणत्या तरी देवदेवीचा अवसर येतो असे भासवून फसवणूक करीत असेल त्याची माहिती आपणास अथवा पोलिस ठाण्यात घ्यावी असेही आवाहन विजय चौकेकर यांनी केले असून भोंदूगिरी करणाऱ्या विरुद्धचा लढा असाच चालू राहील असेही म्हटले आहे .
