स्टोरी

वेंगुर्ले रेडी येथील फोमेंतो कंपनी खनिज उत्खनन प्रक्रियेतून बाहेर पडणारे लाखो लिटर पाणी थेट समुद्रात

Spread the love

वेंगुर्ले (संतोष परब): तालुक्यातील रेडी येथील फोमेंतो कंपनी खनिज उत्खनन प्रक्रियेतून बाहेर पडणारे लाखो लिटर पाणी थेट समुद्रात सोडत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. हे पाणी समुद्रात सोडण्याऐवजी रेडी परिसरातील पाणीटंचाईग्रस्त भागांतील बागायतींसाठी वापरावे, अशी मागणी माऊली युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.याविषयी प्रतिष्ठानने रेडीच्या सरपंचांसह फोमेंतो कंपनीकडे मागणी केली आहे. नागोळे, सुकळभाट, बोंबडोजीची वाडी आणि म्हारतळे या भागांतील कोरड्या भूक्षेत्रांवर जलवाहिन्यांच्या माध्यमातून खाणीतील पाणी उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिष्ठानने सुचवले आहे.

भूजल पातळी घटल्याने विहिरी कोरड्या.

रेडी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये पाण्याचा अभाव जाणवत असल्याचे प्रतिष्ठानने म्हटले आहे. कंपनीच्या खाणी खोल गेल्यामुळे परिसरातील भूजल पातळीवर परिणाम होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी आणि पाणीटंचाई कमी करण्यासाठी कंपनीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.रेडी परिसरात कंपनीच्या माध्यमातून काही चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्या, तरी पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिष्ठानने नमूद केले आहे. खाणीतील पाणी जलवाहिन्यांद्वारे गावातील प्रभावित भागांत सोडण्यासाठी कंपनीने आर्थिक तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मागील वर्षीही बागायतींचे नुकसान.

मागील वर्षी चांगला पाऊस पडूनही एप्रिल आणि मे महिन्यांत पाण्याअभावी रेडीतील माड बागायतींचे मोठे नुकसान झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेता, चालू वर्षी पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे माऊली युवा प्रतिष्ठानने म्हटले आहे.खाणीतील पाण्याचा योग्य वापर केल्यास पाणीटंचाईग्रस्त भागांतील बागायतींना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे समुद्रात सोडले जाणारे पाणी स्थानिक शेती आणि बागायतींसाठी वळवण्याच्या शक्यतेचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी.

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधारे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. एकीकडे पाणी अडवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे खनिज उत्खनन प्रक्रियेतून बाहेर पडणारे पाणी समुद्रात सोडले जात असल्याचा मुद्दा प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधित कंपनीला योग्य पाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.रेडी परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी खाणीतील पाण्याचा पर्यायी स्रोत म्हणून वापर करण्याच्या मागणीवर आता प्रशासन आणि कंपनी काय भूमिका घेतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Related posts

२९ ऑक्टोंबर रोजी मसुरेत महिमा महालक्ष्मीचा दशावतार नाटक…

news

संच मान्यता निकष दि. १५ मार्च २०२४ चा शासननिर्णय रद्द करणेबाबत राजन तेलींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

news

शिक्षक समितीने जोपासली सामाजिक बांधिलकी..!

news

Leave a Comment