सावंतवाडी, ता.१८: येत्या काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, माडखोल येथील धरणाच्या पाणी नियोजनाबाबत तात्काळ बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी माडखोलचे माजी सरपंच संजय लाड यांनी पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग सावंतवाडी तसेच कार्यकारी अभियंता (सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग ओरोस, कुडाळ) यांना सादर करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी दिवसांत तीव्र पाणीटंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचा दुरुपयोग तसेच अनावश्य व जादा वापर थांबवण्यासाठी योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. धरणातील पाण्याची पातळी खालावल्यास लगतच्या गावातील नद्या आणि पिण्याच्या विहिरींची पातळीही खाली जाऊन नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १५ दिवसांत माडखोल येथील श्री पावणाई मंदिर परिसर येथे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि माडखोल ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करून पाण्याच्या योग्य नियोजनाबाबत चर्चा करण्यात यावी, अशी विनंती श्री. संजय लाड यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
