स्टोरी

कलंबिस्त – धावगिरेश्वर परिसरातील ओहोळात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून कच्चा वनराई बंधाऱ्यांची उभारणी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याअभावी करपून जात असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, ओहोळ आटू लागले आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या कलंबिस्त (ता. सावंतवाडी) गावाने मात्र जलसंधारणाची कास धरत संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.कलंबिस्त पंचक्रोशी दुग्धविकास संस्था, शिव साम्राज्य प्रतिष्ठान (गणशेळवाडी) आणि अन्नपूर्णा शेतकरी महिला बचत गट (राऊळवाडी) या तीनही संस्थांनी एकत्र येत कलंबिस्त – धावगिरेश्वर परिसरातील ओहोळात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून कच्चा वनराई बंधारा उभारला आहे.रविवारी सायंकाळी तिन्ही मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीचे दर्शन घडवत श्रमदानातून हा बंधारा उभारला. माती आणि सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती भरून, त्या एकावर एक रचून जवळपास साडेतीन फूट उंचीचा आणि २० फुटांपेक्षा अधिक लांबीचा मजबूत कच्चा बंधारा तयार करण्यात आला. या बंधाऱ्यामुळे ओहोळातील पाणी अडवले जाणार असून आजूबाजूच्या १५ ते २० एकर भातशेतीला थेट फायदा होणार आहे. तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे.

२० ते २५ बंधारे उभारण्याचा निर्धार*कलंबिस्त पंचक्रोशी दुग्धविकास संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण व जलसंवर्धनासाठी काम करत आहे. संस्थेने यापूर्वीही तेरे खोल नदीपात्रात आणि विविध ओहोळांमध्ये वनराई बंधारे उभारले होते. मात्र काही वर्षे ही चळवळ थंडावली होती. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संस्थेने पुन्हा कंबर कसली आहे.या अभियानाचे प्रणेते दुग्ध संस्थेचे चेअरमन अॅड. संतोष सावंत म्हणाले, “कलंबिस्त गावात शेतकऱ्यांना चारा, भातशेती तसेच रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आमची पूर्वीपासून वनराई बंधारे उभारण्याची संकल्पना आहे. गेल्या काही काळापासून ही संकल्पना बंद पडली होती. मात्र आता पुन्हा दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे या गावात जवळपास २० ते २५ कच्चे बंधारे उभारण्याचा आमचा संकल्प आहे. हे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ अभियान आम्ही वर्षभर राबवणार आहोत.”ते पुढे म्हणाले, “पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे तसेच जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी सर्व संस्था, संघटना, बचत गटांना कच्चे बंधारे उभारण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या या हाकेला प्रतिसाद देत आम्ही पाणी फाउंडेशन व महिला बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ गावागावात नेणार आहोत.”

महिला शक्ती आघाडीवर: या कामात अन्नपूर्णा शेतकरी महिला बचत गटाच्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. श्रमदानापासून ते बंधारा उभारणीपर्यंत महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.पंचायत समिती सदस्य *प्रथमेश सावंत* म्हणाले, “कलंबिस्त पंचक्रोशीतील प्रत्येक वाडी-वस्तीवर असे कच्चे बंधारे उभे राहिले पाहिजेत. एका बंधाऱ्याने सुरुवात झाली आहे, हीच खरी जलक्रांती आहे. सर्वांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना राबवावी.”अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या अध्यक्षा *शितल नाईक* म्हणाल्या, “महिला बचत गटाच्या माध्यमातून आणि पाणी फाउंडेशनच्या प्रेरणेतून आम्ही हे अभियान सुरू केले आहे. निश्चितपणे आम्ही या भागात एक जलक्रांती निर्माण करू. आमचे स्वप्न आहे की पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा अभिनेते आमिर खान यांनी आमच्या कलंबिस्त गावाला भेट द्यावी. त्यांना आम्ही या गावात निश्चित आणू. दुग्ध संस्था, महिला बचत गट आणि शिव साम्राज्य प्रतिष्ठान या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून वर्षभरात हे अभियान १०० टक्के यशस्वी करू.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तथा दुग्ध संस्थेचे सचिव रमेश सावंत, शिव साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, रोहन सावंत, स्वप्निल सावंत, विराज सावंत, सुभाष देसाई, सुषमा राऊळ, रंजना राऊळ, रश्मी गवस, शालिनी राऊळ, एकता राऊळ, सुप्रिया राऊळ, स्मिता राऊळ, लक्ष्मी राऊळ, रुक्मिणी राऊळ, राजश्री राऊळ, जयश्री राऊळ, सुनिला राऊळ, वनिता गवस, सविता गवस, कविता जाधव, जागृती सावंत, दिपाश्री जाधव यांच्यासह तिन्ही संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.कलंबिस्तकरांनी दाखवून दिले आहे की, सरकारी मदतीची वाट न पाहता गाव एकत्र आले तर दुष्काळावरही मात करता येते.


Spread the love

Related posts

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी! (दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी)

news

शिक्षक भारतीच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिक निवेदिता नारकर यांचा सेवानिवृत्तीपर जीवनगौरव..!

news

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाकार्य करा : गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे

news

Leave a Comment