स्टोरी

‘एक लाख ५६ हजार अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे.! कोमसापचा ऐतिहासिक उपक्रम.

Spread the love

कुडाळ: महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथील भाषा आणि संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकविण्याच्या उपक्रमात एक लाख ५६ हजार चालकांनी मराठीचे धडे घेतले, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आता साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण ढवळ यांनी कुडाळ येथे दिली. कुडाळयेथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळाच्या वतीनेकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत खजिनदार अनंत वैद्य सहसचिव सुरेश पवार रुजारिओ पिंटो संदीप वालावलकर निलेश जोशी अभिमन्यू लोंढे दिपाली काजरेकर वृंदा कांबळी प्रा संतोष वालावलकर दीपक पटेकर दिपाली काजरेकर वर्षा वैद्य दत्तात्रेय उर्फ बाळ पुराणिक आधी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या मार्फत मराठी रिक्षा टेम्पो आधीचालक वाहक यांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी श्री माने यावेळी उपस्थित होते त्यांच्याकडे आज प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले, महाराष्ट्र शासनाने १९८९ मध्येच महाराष्ट्रात वाहन चालविण्याचे परमिट घेणाऱ्या अमराठी चालकांना मराठी बोलता येणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या ३६ वर्षांत या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली नव्हती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयात पुढाकार घेतल्यानंतर त्याला मूर्त स्वरूप मिळाले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही या उपक्रमाला आर्थिक आणि संस्थात्मक पाठबळ दिले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ अंतर्गत हा उपक्रम १ मे रोजी सुरू करण्यात आला आणि १५ ऑगस्ट रोजी त्याची सांगता झाली. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या दोन संस्थांवर या अभियानाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये कोमसापचे सुमारे १६०० साहित्यिक, प्राध्यापक व कार्यकर्ते अमराठी वाहनचालकांना व्यवहारातील मराठी शिकविण्याच्या कामात सहभागी झाले. अवघड आणि मोठा अभ्यासक्रम न शिकवता केवळ दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडतील अशी मराठीची वाक्ये शिकविण्यावर भर देण्यात आला. दररोज चार वाक्य याप्रमाणे चालकांना मराठी बोलण्याचा सराव करून देण्यात आला.

रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबेर, रॅपिडोच्या चालकांनीही उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला. मराठी बोलण्याचा न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने मराठी बोलण्यास प्रवृत्त करण्याचे काम कोमसापच्या कार्यकर्त्यांनी केले. प्रशिक्षणानंतर कोमसापचे प्रशिक्षक, साहित्यिक आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी चालकांची तोंडी परीक्षा घेतली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यात अमराठी बांधवांची संख्या कमी आहे परंतु छत्तीसही जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात आला असे त्यांनी स्पष्ट केलं या परीक्षेत ७ हजार ७५० चालक अपयशी ठरले, मात्र त्यांनी पुन्हा अभ्यास करून परीक्षा देण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिल्याने आणखी अनेक अमराठी वाहनचालक स्वतःहून पुढे येत असल्याचे डॉ. ढवळ यांनी सांगितले. ठाणे येथे १७ ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र वितरणाचा मोठा कार्यक्रम झाला. त्याचवेळी राज्यातील सुमारे ५० आरटीओ विभागांमध्ये उत्तीर्ण चालकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना देण्यात येणारी प्रमाणपत्रेही आरटीओ अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आली आहेत. “नियम केवळ कागदावर असतात; मात्र त्यांची पूर्तता करताना मानवतेच्या दृष्टिकोनातून भाषा शिकविणे गरजेचे होते. साहित्यिकांचे कार्य केवळ कविता, कथा किंवा कादंबरी लेखनापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काही करण्याची संधी या उपक्रमातून मिळाली. मराठी भाषेचा जागर आणि उत्सव करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असे डॉ. ढवळ यांनी सांगितले.

महाराष्ट्राने आपल्याला व्यवसायाची आणि उदरनिर्वाहाची संधी दिली आहे. त्यामुळे येथील भाषा शिकणे ही केवळ परवाना मिळविण्याची अट न राहता महाराष्ट्राशी जोडले जाण्याची प्रक्रिया व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उर्वरित अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांनीही पुढे येऊन मराठी भाषा शिकावी, असे आवाहन डॉ. ढवळ यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड संतोष सावंत तर कार्यक्रमाचे रूपरेषा जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी केली यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद च्या जिल्हा मंडळातर्फे हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ व आरटीओ अधिकारी श्री माने यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी आरटीओ अधिकारी श्री माने यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विशेष आभार मानले असे उपक्रम सातत्याने राबवा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ते म्हणाले.


Spread the love

Related posts

महाराष्‍ट्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्‍सवांच्‍या ठिकाणी वस्‍त्रसंहिता असायला हवी ! अभिनेत्री दीपाली सय्‍यद खान

news

आमदार आदीती तटकरे यांची म्हसळा तालुक्यासाठी कोटीची उड्डाने

news

उरण नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन!

news

Leave a Comment