सावंतवाडी / प्रतिनिधी: पुस्तकी वाचन संस्कृती आज कमी होत चालली आहे. प्रत्येक पालक आणि मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल आला आहे. मग अशा स्थितीत गावातील मराठी शाळा आणि वाचन मंदिरे टिकणार कशी? जर गावातील मराठी शाळा आणि वाचन मंदिरे भौतिकदृष्ट्या विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनीच आता आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवून थोडा वेळ ज्ञानेश्वरी तसेच इतिहासकालीन पुस्तके जेव्हा पुन्हा चाळायला घेतील तेव्हाच पाल्य आपसूकच वाचन संस्कृतीकडे वळतील. वाचाल तर वाचाल, आज MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षा किंवा आजच्या तंत्रज्ञान युगात पुस्तक चाळणे फार महत्त्वाचे आहे, तरच तुम्ही तुमच्या पुढील जीवनात पाय रोवून उभे राहू शकता. गावात MPSC, UPSC च्या धर्तीवर कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाच्या वतीने अभ्यासक्रम, पुस्तके, मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल, असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी स्पष्ट केले.कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कलंबिस्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या वतीने वाचक प्रेरणा दिन व माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने वाचाल तर वाचाल हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीदेवी सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर गावच्या सरपंच सपना सावंत, ज्ञानमंदिर वाचनालयाचे नूतन अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, माजी पंचायत समिती सदस्य तथा संचालक रमेश सावंत, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेडगे, कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा संचालिका मीनल जंगम, संचालक सखाराम उर्फ बाबू सावंत, अनिल उर्फ भाई सावंत, सिद्धेश सावंत, बाळा राजगे, माजी सरपंच बाळू सावंत, माजी सैनिक सगणु पास्ते, पांडुरंग सावंत, बाळा सावंत, कवी रवींद्र तावडे, शिक्षिका श्वेता सावंत, विनायक शिरसाट, ग्रंथपाल कविता जाधव, दीपा श्री जाधव, किशोर वालावलकर, रवी कमल सावंत, अंगणवाडी सेविका सौ. बिडये, सौ. पवार आदी पालक शिक्षक उपस्थित होते.यावेळी वाचक प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम तसेच इतर पुस्तकांचे वाचन केले. यावेळी स्वानंद पावसकर, जीविका सावंत, ऋतिका सावंत, सौरभ कलंबिस्तकर या विद्यार्थ्यांनी विविध गोष्टी तसेच शास्त्रज्ञ यांची पुस्तकांचे वाचन केले. यावेळी जयसिंग देसाई यांनी अंगणवाडीतील मुलांना पुस्तक तसेच शैक्षणिक साहित्य दिले, त्याचे वितरण करण्यात आले. तर माजी विद्यार्थी रवींद्र तावडे व रवी कमल सावंत यांच्या हस्ते शाळेला भौतिक गरज असलेल्या वस्तूंचे किट शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेडगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाच्या वतीने इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी पुस्तक वाचावे यासाठी पुस्तक संच उपलब्ध करून देण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना वाचन मंदिरचे अध्यक्ष ॲड. सावंत म्हणाले, गावातील मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा विद्यार्थी पटसंख्या अभावी बंद पडण्याची भीती आहे. पण जोपर्यंत अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळेमध्ये मुलांचा ओढा वाढायला हवा, मराठी शाळा हीच पुढील जीवनाचा आणि गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावातील अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि वाचन मंदिर हे सर्व महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीने मराठी शाळेत जो गरीब व शेतकऱ्यांचा विद्यार्थी शिकेल त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांची घरपट्टी माफ करावी असा उपक्रम राबवल्यास गावची मराठी शाळा बंद पडू दिली जाणार नाही. यासाठी गावात शैक्षणिक उपक्रम नाविन्यपूर्ण असे एकोप्याने काम केले जाईल. पण गावची शाळा बंद पडू दिली जाणार नाही. ज्ञानमंदिर वाचनालयाच्या वतीने येथे वर्षभरात MPSC, UPSC चे अभ्यासक्रम पुस्तिका संच उपलब्ध करून दिले जातील. तसेच मार्गदर्शन वर्गही घेतले जातील. गावातील एक तरी पाल्य विद्यार्थी येत्या पाच वर्षात शासकीय सेवेत उच्च पदावर MPSC, UPSC च्या धरतीवर पोहोचेल असे उपक्रम घेतले जातील.

यावेळी मुख्याध्यापक अभिजीत जाधव म्हणाले, आज अनेक गावात घरामध्ये पूर्वीसारखी गजबज नाही, शहरी भागाकडे ओढ वाढला आहे. याचे कारण रोजगार, नोकरीसाठी मोठ्या शहरात गावातील मंडळी जात आहेत आणि त्यामुळेच गावातील मराठी शाळेची पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गावच्या पंचक्रोशीत रोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या तर गाव पूर्वीसारखे गजबजेल आणि शाळाही टिकतील.यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय शेडगे म्हणाले, जिल्हा परिषदच्या मराठी शाळांमध्ये शिकूनच आज अनेकजण उच्चस्तरीय पदावर पोहोचले आहेत. त्यामुळे मराठी शाळांमध्येच पालकांचा ओढा वाढला आहे. पण मराठी शाळांमधील भौतिक प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एकसंघ काम करायला हवे.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रेया शरद सावंत यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होत *-* ज्ञानमंदिर वाचनालय येथे सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी सरस्वती मातेकडे साकडे घालण्यात आले की, गावातील मराठी शाळा व वाचन मंदिर यांच्याकडील ओढा वाढवावा आणि वाचनाची गोडी प्रत्येक नागरिकाला लागावी अशी सद्बुद्धी सर्वांना दे. यावेळी अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, वाचन मंदिरचे सचिव रूपा सावंत, संचालक सखाराम उर्फ बापू सावंत, सिद्धेश सावंत, मीनल जंगम, कविता जाधव, दीपा श्री जाधव आदी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेतही सरस्वती पूजन जल्लोषात साजरे करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम, भजन आदी कार्यक्रम करण्यात आले.
