मसुरे प्रतिनिधी: आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब (रजि.) व पळसंब शाळा क्र. १ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण, परिसर स्वच्छता आणि नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये NSS स्वयंसेवकांनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची गरज आणि व्यसनमुक्त जीवनाचे फायदे याविषयी प्रभावी जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी, प्रबोधन आणि प्रत्यक्ष श्रमदानातून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.याचबरोबर नशामुक्ती अभियानांतर्गत NSS स्वयंसेवकांनी गावातून फेरी काढून तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. “व्यसनमुक्त युवक – सुदृढ भारत”, “नशा सोडा, जीवन जोडा”, “स्वच्छ गाव – निरोगी गाव” अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगत युवकांना निरोगी, सुसंस्कृत आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब (रजि.) चे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत, आजीव सभासद श्री. दिनेश परब, मुख्याध्यापक श्री. विनोद कदम, उपसरपंच श्री. अविराज परब, माजी उपसरपंच श्री. मोहन आपकर, श्री. अमित पुजारे, सामाजिक कार्यकर्ते श्री. पिठ्या सावंत, आचरा कॉलेजचे प्राचार्य प्रा. नितेश सारंग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हिंदळेकर मॅडम तसेच प्रा. अच्युत कांबळी उपस्थित होते.
