क्राईम

मुंबई पोलीस भरतीत बटण कॅमेर्‍याचा वापर करून ब्‍ल्‍यूटूथद्वारे शेकडो जणांनी लिहिली उत्तरे! एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेतले!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: मुंबई पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अपप्रकार झाल्‍याचे समोर आले आहे. उमेदवारांनी बटण कॅमेर्‍याच्‍या साहाय्‍याने प्रश्‍नपत्रिकांची छायाचित्रे काढून ती ई-मेलद्वारे बाहेर पाठवली आणि बाहेर असलेल्‍या शिक्षकांनी त्‍यांना मायक्रो ब्‍ल्‍यूटूथद्वारे उत्तरे सांगितली. शेकडो जणांनी अशा प्रकारे परीक्षा दिली. एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेण्‍यात आल्‍याचा दावा स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष राहुल कवठेकर यांनी केला आहे. कवठेकर यांनी तब्‍बल १६ प्रकारच्‍या प्रश्‍नपत्रिकांची छायाचित्रे मुंबई पोलिसांना पुरावा म्‍हणून दिली आहेत. भांडुप पोलिसांनी कवठेकर यांचा १८ मे या दिवशी जबाब नोंदवला आहे. विशेष अन्‍वेषण पथकाकडून (एस्.आय.टी.कडून) भरती प्रक्रियेतील या अपप्रकाराची चौकशी व्‍हावी, अशी मागणी समितीने केली आहे.

मुंबई पोलीसदलात रिक्‍त ७ सहस्र ७८ जागांसाठी ७ मे या दिवशी लेखी परीक्षा पार पडली. एकूण २१३ केंद्रांवरून ७८ सहस्र ५२२ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. भरती प्रक्रियेत उच्‍च दर्जाच्‍या पद्धतीचा वापर करून अपप्रकार केला जाणार असल्‍याची कुणकुण स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीला लागली होती. समितीचे अध्‍यक्ष राहुल कवठेकर यांनी ५ मे या दिवशीच याविषयी मुंबई पोलिसांना माहिती दिली होती.

यानंतर पोलिसांनी केलेल्‍या पडताळणीत काही जण अशा प्रकारे कॉपी करतांना आढळून आले होते. यात कस्‍तुरबा मार्ग पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाणे आणि भांडूप पोलीस ठाण्‍यात स्‍वतंत्र गुन्‍हे नोंदवले आहेत. १७ मे या दिवशी मुंबई पोलीसदलातील भरतीसाठीची अंतरिम गुणवत्ता सूची घोषित झालेली आहे; मात्र समितीने मुंबई येथील पोलीस उपायुक्‍त पुरुषोत्तम कराड यांचीही भेट घेऊन या प्रकरणी माहिती दिली आहे.


Spread the love

Related posts

पुण्यात अटक केलेल्या आतंकवाद्यांकडे सापडली संवेदनशील स्थळांची छायाचित्रे!‘

news

बांदा पोलीसांकडून गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

news

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ अंतर्गत वैभव सोनावणेवर वेंगुर्ले पोलीसांत गुन्हा दाखल

news

Leave a Comment