मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” या उपक्रमांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमास डॉ. प्रदीप ढवळ (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्था तथा कार्याध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करून प्रवाशांशी आत्मीय, नम्र व सौजन्यपूर्ण संवाद मराठीतून साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असून सार्वजनिक वाहतूक सेवेत तिचा प्रभावी वापर प्रवाशांचा विश्वास दृढ करण्यास उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांनी उपक्रमाची माहिती देत उपस्थितांशी संवाद साधला. तसेच मोटार वाहन निरीक्षक निलेश ठोंबरे उपस्थित होते.कार्यक्रमास जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघटना, सिंधुदुर्ग तसेच कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये श्री. नागेश ओरोसकर (अध्यक्ष), विजय कांबळी ,महेश आंग्रसकर, रवी माने, मंगेश सावंत आणि सुनील पाताडे यांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना “महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा” या उपक्रमाची माहितीपत्रके वितरित करण्यात आली. तसेच मराठी भाषेचा सन्मान राखत प्रवाशांशी सौजन्यपूर्ण व आत्मीयतेने संवाद साधून उत्कृष्ट सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले.
