Uncategorized

या कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांची ओढ…!

Spread the love

सिंधुदुर्ग: दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने माणगाव ग्रामपंचायत येथे आयोजित केलेल्या सेंद्रिय शेतीपर माहिती केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेंद्रिय शेतीचे भविष्य पाहता आणि महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे वाढत असलेला कल पाहून विविध सेंद्रिय शेती पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने या माहिती केंद्राचे आयोजन करण्यात आले होते.

या माहिती केंद्रामध्ये जनावरांना कमी खर्चामध्ये पौष्टिक खाद्य म्हणून अझोला निर्मिती प्रकल्प तसेच गांडूळ खत निर्मिती, जीवामृत निर्मिती, दशपर्णी अर्क बनवण्याची प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जैविक खते, बीजामृत, पंचगव्य यासंदर्भातही माहिती देण्यात आली.

यावेळी कृषी सह्याद्री गटाचे सुबोध नलवडे, प्रतीक चेडे, श्रीकांत शिंदे, संकेत देशमुख, अथर्व नलवडे, रोशन पाटील, शिवम घरबुडे, गौरव मिसळ, यश पवार यांनी प्रदर्शित तंत्रज्ञानांची माहिती सांगितली. या माहिती केंद्रामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नारळ काढणी यंत्र, वैभव विळा, कोनोवीडर, नारळ सोलणी यंत्र, नूतन झेला आदी गोष्टी प्रदर्शनाला ठेवण्यात आल्या होत्या. तसेच संपूर्णा, आफ्रिकन टॉल, सिओ-३, पराग्रास या गवतांचे छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले होते.

या माहिती केंद्रातून कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांची ओढ दिसून आली. या सर्व कार्यक्रमात कोकण कण्याळ शेळी व कोकण कपिला गाईचे माहिती सत्र खास आकर्षण ठरले. विद्यापीठाच्या कृषी सह्याद्री गटाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला निळेली पशुपैदास केंद्र, मुळदे उद्यानविद्या महाविद्यालय, माणगाव ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Related posts

मार्च १९९३ च्या आमच्या विद्यार्थी बॅचकडून देवबाग हायस्कूलला शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक मदत

news

पोर्ट ब्लेअरमधील टर्मिनल इमारतीचे उद्या उद्घाटन; पंतप्रधानांची डिजिटल माध्यमाद्वारे उपस्थिती

news

शिवसेना दैनंदिनी २०२४ चे ‘मातोश्री’ येथे प्रकाशन!

news

Leave a Comment